Tuesday, July 22, 2008

पहिलं प्रेम...

ती म्हणाली,
" मी पहिल्यांदा कुणाचा हात असा हातात घेतेय,
पहिल्यांदाच कुणाची इतकी ओढ वाटतेय !
हा पहिला स्पर्श मी आयुष्यभर जपून ठेवेन "

मी नाही म्हणू शकलो तसंच
कारण....
माझ्या जवळ जवळ सगळ्याच पहिल्या वेळा
आधिच झालेल्या

खरं तर पहिला शब्द सोडला तर
माझ्याही मनात भावना तशाच,
तितक्याच उत्कट
पण तिच्या अपेक्षांसमोर अपूर्‍या,
अधुर्‍याच 'पहिल्या' शब्दाविना...

तिनं माझ्या डोळ्यांत बघितलं
आणि तिला जे कळायचं ते कळलं
नकळत हातात घेतलेला हात
तिने अगदी हळूवारपणे सोडवून घेतला
मग....
मी नाहीच थांबवू शकलो,
तिच्या पापण्यांत डोकावणारी आसवं
माझ्या मनात येणारी आठवं
' मला उशीर होतोय मी निघते म्हणत '
तिची निरोप घेणारी पावलं

आणि तितक्यात...
पाऊस आला
अगदी मुसळधार
मी नेहमीसारखाच होतो छ्त्रीशिवाय
आज तीही छत्री विसरलेली
तसं भिजणं, आम्हां दोघांच्या आवडीचं

पुढच्या काही क्षणांतच आम्ही दोघेही चिंब झालो
ती थांबली, वळली....
मी जवळ गेलो
आणि ती पटकन मिठीत शिरली....
मी, " पहिला पाऊस कधीच पडून गेला ग! "
ती, " हो, पण आताचा पाऊसही तितकाच खरा आहे ! "

-------------------------------- जगदिश

Thursday, July 17, 2008

पाऊस....बाहेरचा आणि आतला

खिडकीत बसून
बाहेर कोसळणारा पाऊस बघणं
आता नेहमीचंच झालंय
हल्ली मी पावसात भिजायला जात नाही
तुझ्याविनाच चिंब व्हायचं?
छे! मनच मानत नाही

मग थेंबांनाही वाटते ओढ माझी
येतात ते माझ्या खिडकीपर्यंत
पण ओंजळ पूढे करून
मी त्यांना अनुभवत नाही
तुझा आधार सुटल्यापसून
हातच पुढे सरत नाही

कधी पाउस वाराही घेतो साथिला
अन् डोकावू पाहतो माझ्या घरात
खिडकीचं बंद होणं तेव्हा
एक क्षणही लांबत नाही
हल्ली तुझ्या आठवणींना
घरातच मी घेत नाही

आज मात्र मला पावसानं
भर रस्त्यात पकडलं
आठवण करुन देऊन तुझी
अन् मग विचारलं,
"तुला झालंय तरी काय?"
मी म्हटलं नातं तुटलं,
आता कुणाची सोबत नाही
तूही जा आता
जून्या आठवणींशी मी
मन माझं जोडत नाही

तो गेला, थोडा रागावून
न भिजवता !
भिजण्यापासून तर वाचलो
प्रश्न एकच होता,
मनात दाटलेल्या पावसापासनं
मी कसा वाचणार आता ?

----------------------------------------- जगदिश

Wednesday, June 4, 2008

रातराणी आणि गुलमोहर

' आज रातराणी दरवळत नाहिये रोजच्यासारखी ! '
सखीनं अंगणात येऊन बघितलं......
आणि....रातराणीला पाहून सखी हिरमूसली

ती फुलली तर नव्हतीच, उन्मळून पडली होती
थोड्या कोमोजलेल्या फुलांसह
विस्कटलेल्या, ओरबाडलेल्या पानांमधे

सखीही खचली, उदास झाली
जिच्या साथीत इतक्या राती जागवल्या होत्या
जिच्या असण्यानं चोहो दिशा भारुन टाकल्या होत्या
जिनं सखीला विरहात सावरलं होतं
जिच्या दरवळत्या गंधानं तन-मन मोहरलं होतं
ती आज नव्हती....
आणि यापूढे कधीच असणार नव्हती

मग सखी एकटीच जागली एक रात्र
आठवणी आल्या
श्वास अडले
क्षण बावरले
नभ कातर झालं
मेघ बरसले
डोळे थकले
आणि हळूवार, नकळतच
मिटूनही गेले

सकाळी जाग आल्यावर
सखी गच्चीत गेली
तशीच उदास... दु:खी

समोर बघीतलं तर
गुलमोहर बहरला होता......

सखीच्या ओठांवर हसू फुललं
ती दु:ख विसरली
रात विसरली
त्या बहरात हरवली

अंगणात तर रातराणी नव्हतीच आता
आणि सखीच्या मनातही
गुलमोहरच भरला होता !

----------------------------------------- जगदिश

Thursday, March 20, 2008

सुकलेली फुलं...... Revised.....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

तिच्या डोळ्यांत बघून एकदा म्हणायचयं
" सगळं जग तुझ्यामूळे माझं झालयं
तरी एक करशील ?
मीच माझा उरलो नाही
तुझा झालोय !
तू माझी होशील ? "

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

-------------------------- जगदिश

Wednesday, March 19, 2008

चांदणे....

गोठती नजरा अशा की बोलणे राहून जाते
मागण्याआधीच मिळते मागणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

सांज वेडी रंगताना तार अन् झंकारताना
साजणीही धुंद होते साद मजला घालताना
हात हाती गुंफताना रात अन् अंधारताना
श्वास वेडे स्पर्श वेडे अधर ओठी बांधताना

प्रीत फुलते धुंद होते प्रणयही बहरून येतो
बंधने तुटता मनाला रोखणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

पावसातून नाहताना गार वारा साहताना
अंगभर उठते शहारे या मना वेडावताना
रातभर कधी जागताना चांदण्यांना झेलताना
प्रियतमेला पाहतो मी अंतरी आनंदताना

बरसतो उल्हास आणि आठवांना भारती क्षण
वेळ ही ढळली तरीही भारणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

------------------------------------ जगदिश

Tuesday, March 18, 2008

या आयुष्याची कविता मांडत असतो.....

संधेत रंगत्या नभात नाहत असतो
अन् रातीला तार्‍यांशी बोलत बसतो
चांदवा कितिदा येतो कवितेमधूनी
जागूनी रातभर पहाट शोधत असतो

मी रानफुलांच्या गंधासोबत वाहतो
अन् खळखळत्या ओढ्यांतून वळसे घेतो
वैशाख मागतो श्रावणसरीचे थेंब
मग रिमझिमता मी पाऊस बरसत असतो

प्रत्येक स्पंदना पूर्णत्वाने जगतो
अन् आसवांस दवबिंदू समजून जपतो
रातीत स्वतःला स्वतःच करतो साथ
विरहाला मी खूबीने फसवत असतो

मी आठवणींचे तोरण बांधत असतो
अन् उगा कधी दु:खाशी भांडत बसतो
शब्दांत गुंफतो क्षणोक्षणीचा हर्ष
या आयुष्याची कविता मांडत असतो

----------------------------------------- जगदिश