Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Monday, June 22, 2009

आजही स्मरणात सारे

आजही स्मरणात सारे काल घडलेले
उंबर्‍यापाशी तिचे पाऊल अडलेले

ओल श्वासांना कसा पाऊस नसताना?
आठवांना आसवांचे थेंब जडलेले

वाटते येऊ नये आता पहाटेने
झोपले नुकतेच डोळे रात रडलेले

उत्तरे शोधायची धडपड कशासाठी?
उत्तरांनाही हजारो प्रश्न पडलेले

पाहतो आहे उपेक्षाही अपेक्षांची
वेदनांचे हुंदके हास्यात दडलेले

खातरी नाही अताशा फारशी माझी
स्पंदनांचे धावणे पुरते बिघडलेले

जगदिश

Wednesday, June 4, 2008

रातराणी आणि गुलमोहर

' आज रातराणी दरवळत नाहिये रोजच्यासारखी ! '
सखीनं अंगणात येऊन बघितलं......
आणि....रातराणीला पाहून सखी हिरमूसली

ती फुलली तर नव्हतीच, उन्मळून पडली होती
थोड्या कोमोजलेल्या फुलांसह
विस्कटलेल्या, ओरबाडलेल्या पानांमधे

सखीही खचली, उदास झाली
जिच्या साथीत इतक्या राती जागवल्या होत्या
जिच्या असण्यानं चोहो दिशा भारुन टाकल्या होत्या
जिनं सखीला विरहात सावरलं होतं
जिच्या दरवळत्या गंधानं तन-मन मोहरलं होतं
ती आज नव्हती....
आणि यापूढे कधीच असणार नव्हती

मग सखी एकटीच जागली एक रात्र
आठवणी आल्या
श्वास अडले
क्षण बावरले
नभ कातर झालं
मेघ बरसले
डोळे थकले
आणि हळूवार, नकळतच
मिटूनही गेले

सकाळी जाग आल्यावर
सखी गच्चीत गेली
तशीच उदास... दु:खी

समोर बघीतलं तर
गुलमोहर बहरला होता......

सखीच्या ओठांवर हसू फुललं
ती दु:ख विसरली
रात विसरली
त्या बहरात हरवली

अंगणात तर रातराणी नव्हतीच आता
आणि सखीच्या मनातही
गुलमोहरच भरला होता !

----------------------------------------- जगदिश

Thursday, March 20, 2008

सुकलेली फुलं...... Revised.....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

तिच्या डोळ्यांत बघून एकदा म्हणायचयं
" सगळं जग तुझ्यामूळे माझं झालयं
तरी एक करशील ?
मीच माझा उरलो नाही
तुझा झालोय !
तू माझी होशील ? "

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

-------------------------- जगदिश

Wednesday, March 19, 2008

चांदणे....

गोठती नजरा अशा की बोलणे राहून जाते
मागण्याआधीच मिळते मागणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

सांज वेडी रंगताना तार अन् झंकारताना
साजणीही धुंद होते साद मजला घालताना
हात हाती गुंफताना रात अन् अंधारताना
श्वास वेडे स्पर्श वेडे अधर ओठी बांधताना

प्रीत फुलते धुंद होते प्रणयही बहरून येतो
बंधने तुटता मनाला रोखणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

पावसातून नाहताना गार वारा साहताना
अंगभर उठते शहारे या मना वेडावताना
रातभर कधी जागताना चांदण्यांना झेलताना
प्रियतमेला पाहतो मी अंतरी आनंदताना

बरसतो उल्हास आणि आठवांना भारती क्षण
वेळ ही ढळली तरीही भारणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

------------------------------------ जगदिश

Tuesday, March 18, 2008

या आयुष्याची कविता मांडत असतो.....

संधेत रंगत्या नभात नाहत असतो
अन् रातीला तार्‍यांशी बोलत बसतो
चांदवा कितिदा येतो कवितेमधूनी
जागूनी रातभर पहाट शोधत असतो

मी रानफुलांच्या गंधासोबत वाहतो
अन् खळखळत्या ओढ्यांतून वळसे घेतो
वैशाख मागतो श्रावणसरीचे थेंब
मग रिमझिमता मी पाऊस बरसत असतो

प्रत्येक स्पंदना पूर्णत्वाने जगतो
अन् आसवांस दवबिंदू समजून जपतो
रातीत स्वतःला स्वतःच करतो साथ
विरहाला मी खूबीने फसवत असतो

मी आठवणींचे तोरण बांधत असतो
अन् उगा कधी दु:खाशी भांडत बसतो
शब्दांत गुंफतो क्षणोक्षणीचा हर्ष
या आयुष्याची कविता मांडत असतो

----------------------------------------- जगदिश

Tuesday, April 10, 2007

जरी वाटते मज....... Poem for all those all who have some beautiful girl in their life

(Note : Please use Internet Explorer if you have difficulty in reading marathi)

जरी वाटते मज

जरी वाटते मज तुला मी पहावे
कीती पाहण्याचे बहाणे मिळावे
कधी वाटते की तुलाही कळावे
कसे सांगण्याचे तराणे जुळावे

मी समजावे तुजला, तुला मी कळावा
ना प्रेमात जरी तू जरा आवडावा
अधरांत तुझिया जे गीत असते,
त्या गीतात माझे रहाणे असावे

तू सामोरी येता जे ओठांत अडती
ते पुढच्या श्वासाला नयनी उतरती
तू डोळ्यांतले गीत वाचावे अथवा
निशब्दांस स्पर्शाचे गाणे सुचावे

तुला ना समजती माझे बोल सारे
की समजूनही सर्व माझे इशारे
मला तू झुरवण्या जराशी भुलवण्या
उगा शब्द खेळत उखाणे म्हणावे

कधी एकला मी वळणी उभा अन्
तुझी भेट व्हावी थांबावा क्षण
नयनांत तुझिया होकार यावा
मिठीला क्षणांचे न जाणे कळावे

-------------------------- जगदिश



Tuesday, March 6, 2007

आपलंही कुणीतरी असावं! A poem for all those singles looking for someone..

(Note : Please use Internet Explorer if you have difficulty in reading marathi)

आपलंही कुणीतरी असावं!

ह्या खांद्यावर डोकं ठेवून
तिला रडावसं वाटावं
काँलेजनंतर मागे थांबून
सोबत बसावसं वाटावं

ज्या स्वप्नांमधे माझ्या
सगळ्या रात्री जागतात
त्या स्वप्नांमधे हरवून
तिलाही जागावसं वाटावं

माझे आसू पुसून तिनं
आमच्या सुखात हसावं
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं!


छोट्या छोट्या गोष्टींमधे
खोटं खोटं चिडावं
पण, भेटीनंतर निघते म्हणताना
तिचं पाऊल अडावं

बाकी सगळ्या जगाचा
पडेलच विसर तेव्हा
तिनं माझ्या प्रेमात
अगदी आकंठ बुडावं

ह्या छोट्याश्या स्वप्नानं
एकदाच खरं व्हावं
नेहमीच वाटतं यार,
आपलंही कुणी असावं!

-------------------------- जगदिश

सुकलेली फुलं A poem for all those who are in love.....

(Note : Please use Internet Explorer if you have difficulty in reading marathi)

सुकलेली फुलं

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

-------------------------- जगदिश