Monday, June 22, 2009

आजही स्मरणात सारे

आजही स्मरणात सारे काल घडलेले
उंबर्‍यापाशी तिचे पाऊल अडलेले

ओल श्वासांना कसा पाऊस नसताना?
आठवांना आसवांचे थेंब जडलेले

वाटते येऊ नये आता पहाटेने
झोपले नुकतेच डोळे रात रडलेले

उत्तरे शोधायची धडपड कशासाठी?
उत्तरांनाही हजारो प्रश्न पडलेले

पाहतो आहे उपेक्षाही अपेक्षांची
वेदनांचे हुंदके हास्यात दडलेले

खातरी नाही अताशा फारशी माझी
स्पंदनांचे धावणे पुरते बिघडलेले

जगदिश

No comments: