Sunday, June 7, 2009

वायदे...

वायदे करती हजारो पाळणारे शोधतो
माणसाला माणसागत मानणारे शोधतो

बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण या मनीचे जाणणारे शोधतो

दोन शोधा चार मिळती सूख असता सोबती
दु:खही दिसता जरासे थांबणारे शोधतो

बाह्यरुपाला बघोनी लायकी ठरते जिथे
कातडीच्या आतलेही पाहणारे शोधतो

जाहल्या जखमा कहाण्या यातना झाल्या जुन्या
मी नव्याने घाव आता घालणारे शोधतो

नीज येता पाहणे स्वप्ने सुखाने रोजचे
घेउनी स्वप्ने उराशी जागणारे शोधतो

अंत येता ढाळण्याला आसवे कोणी नको
आज मी पार्थिव माझे जाळणारे शोधतो

जगदिश

No comments: