Monday, June 22, 2009

आजही स्मरणात सारे

आजही स्मरणात सारे काल घडलेले
उंबर्‍यापाशी तिचे पाऊल अडलेले

ओल श्वासांना कसा पाऊस नसताना?
आठवांना आसवांचे थेंब जडलेले

वाटते येऊ नये आता पहाटेने
झोपले नुकतेच डोळे रात रडलेले

उत्तरे शोधायची धडपड कशासाठी?
उत्तरांनाही हजारो प्रश्न पडलेले

पाहतो आहे उपेक्षाही अपेक्षांची
वेदनांचे हुंदके हास्यात दडलेले

खातरी नाही अताशा फारशी माझी
स्पंदनांचे धावणे पुरते बिघडलेले

जगदिश

Sunday, June 7, 2009

पत्त्यातल्या राजाची गोष्ट

पत्त्यामधले राजा राणी
आयुष्याचा खेळ
मजेत खेळत असतात

कधीतरी काय होतं,
राजा हरवतो...
मग कुठल्यातरी पत्त्याला राजा बनवलं जातं
पण राणीला तो खोटा राजा नाही आवडत...
ती खेळ खेळत राहते
मजेत...
पण... गुलामासोबत...

आणि कधीतरी...
राजा नाही, राणी हरवते
पून्हा कुठल्यातरी
दूरी नाहीतर तीरीला
राणी बनवलं जातं
राजालाही ते नाही आवडत...
पण राणीसारखा त्याला
दूसरा पर्याय नसतो...
त्याला त्याच खोट्या राणीसोबत
खेळत रहावं लागतं

मग चौकट असो, किलवर असो
इस्पिक अथवा बदाम
राजा राहतो जगत उदास उदास...
पत्त्यांच्या एका कोपर्‍यात...
स्वतःच हरवेपर्यंत !

जगदिश

जायचे होते तुला तर....

जायचे होते तुला तर थांबुनी वळलीस का?
उंबरा ओलांडताना नेमकी अडलीस का?

वार तू करता विखारी, शब्दही भांभावले
माझिया प्रश्नांवरी मग मौन तू बसलीस का?

तू निरोपाला हसोनी मानले मजला खूळे
पाठमोरी होउनी मग आसवे टिपलीस का?

एकदा तू सांग माझ्या पाहुनी डोळ्यांमधे
एवढे मी बोलता तू लोचने मिटलीस का?

घेतले माझ्या वसंताला जरी तू सोबती
पानगळ शिशिरातली झाल्यापरी झडलीस का?

जगदिश

वायदे...

वायदे करती हजारो पाळणारे शोधतो
माणसाला माणसागत मानणारे शोधतो

बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण या मनीचे जाणणारे शोधतो

दोन शोधा चार मिळती सूख असता सोबती
दु:खही दिसता जरासे थांबणारे शोधतो

बाह्यरुपाला बघोनी लायकी ठरते जिथे
कातडीच्या आतलेही पाहणारे शोधतो

जाहल्या जखमा कहाण्या यातना झाल्या जुन्या
मी नव्याने घाव आता घालणारे शोधतो

नीज येता पाहणे स्वप्ने सुखाने रोजचे
घेउनी स्वप्ने उराशी जागणारे शोधतो

अंत येता ढाळण्याला आसवे कोणी नको
आज मी पार्थिव माझे जाळणारे शोधतो

जगदिश

सुख...

" आनंद जगण्यात चिक्कार झाला
सदा हासणे एक उपचार झाला
जरा दू:खही दे मला ईश्वरा रे
सुखाने अता जीव बेजार झाला "

एवढं लिहिलं
आणि स्वप्नातनं जाग आली ...
पून्हा झोपी जाताना
उशी तेवढी उलटी केली
भिजलेली !

जगदिश

Sunday, January 4, 2009

गंध

तुझ्या ओंजळीतल्या फुलांचा गंध अजून येतोय
काय करू? माझं मन
आठवणींमधून बाहेर पडायलाच तयार नाहीये !!

जगदिश

Thursday, January 1, 2009

संवाद

मला झोप येत नाहीये
आणि मला खात्री आहे तुलाही झोप आली नसेल
दोघेही जागे असलो तरीही, आज इथे संवाद नाहीये
आहे फक्त शांतता आणि अंधार
उद्देश तर होता सुसंवाद साधायचा
पण विसंवाद झाला
थोडं भांडणही
मग माझं भरून येणं
खूप दिवसांनी बरसात झालेय
आभाळ मस्त निरभ्र झालं
आता नाही लावायचाय चुकांचा हिशेब
आता आहे फक्त आशा... अपेक्षा नाही
उद्या पून्हा अशीच जाग असेल आपल्या घरात... संवादासह !

जगदिश