Wednesday, December 31, 2008

शब्द

भले शब्द होते, बुरे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा तसे शब्द होते

तिला बोलणे वाटले सर्व सोपे
मला बोचल्यासारखे शब्द होते

कुणी साक्ष द्यावी, कुणी साक्ष घ्यावी?
विकाऊच सारे इथे शब्द होते

असे बोललो की न आवाज झाला
मनी बांधलेले मुके शब्द होते

थिटा जाहला अर्थ भाषेतलाही
असे स्पर्श प्रीतीतले शब्द होते

अता पाळणारे इथे राहिले ना
कधी प्राण द्यावे असे शब्द होते

मनाच्या तळाशी अता रात आहे
जिथे चांदण्यांचे तुझे शब्द होते

जगदिश

Saturday, December 27, 2008

प्रश्न आणि शब्द...

तू जाताना सापडलेच नाहीत...
म्हणून राग धरु?
की तू गेल्यावरही साथ देत आहेत...
म्हणून आपलं म्हणू?

एवढाच प्रश्न... एवढेच शब्द..... !

---------------------------------------- जगदिश

Monday, December 8, 2008

मी माणूस?

सकाळी एक भूकेलेलं पोट अतिशय भिकार नजरेनं माझ्याकडे बघतं
मी त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकतो
मग संध्याकाळी चवीनं कोंबडीचा आस्वाद घेतो आणि म्हणतो, 'मी माणूस !'

मॉलच्या बाहेर अजून एक गरजू भेटतो
केविलवाणा चेहरा करून, 'एक रुपया द्या हो साहेब', म्हणतो
मी त्याच्यावर चिडतो, त्याला हाकलतो, मॉलमधे जातो
दोन हजाराची ब्रँडेड जीन्स विकत घेतो, वर दीड हजाराचा शर्टही घेतो
तो घालून मिरवतो आणि म्हणतो, 'मी माणूस !'

ऑफिसमधून घरी येताना रस्त्यात एक अपघात झालेला दिसतो
बघ्यांची गर्दी झालेलीच असते, मीही त्यात समिल होतो
'स्टोरी काय?' जाणून घेतो
कुणीतरी म्हणतं, 'उचला रे त्यांना, हॉस्पिटलमधे नेऊ!'
मी हळूच काढता पाय घेतो
दूसर्‍या दिवशी तीच स्टोरी तिखट - मीठ लावून सांगतो आणि म्हणतो 'मी माणूस!'

'स्फोट झालेत' न्यूज येते,
मी सुन्न होतो, चुकचूकतो.. थोडाच वेळ...
मग १६ की १७, मित्रासोबत वाद घालतो
'मीच बरोबर', त्याला एकदा न्यूज चॅनेल दाखवतो
जिंकल्याचा आनंद घेतो
चॅनेल बदलतो, क्रिकेट बघू लागतो आणि म्हणतो 'मी माणूस!'

कवी आहे, कविता लिहितो
दू:ख, अत्याचार, दुर्दशा शब्दांमधे प्रभावीपणे रेखाटतो
कधी करूण, कधी रागीट चेहरा करुन लोकांसमोर सादर करतो
वाहवा, टाळ्या मिळवतो, आणि....
मनातल्या मनात स्वतःवरच खूश होत वही मिटतो
आणि म्हणतो 'मी माणूस!'
--------------------------------------------जगदिश

Tuesday, July 22, 2008

पहिलं प्रेम...

ती म्हणाली,
" मी पहिल्यांदा कुणाचा हात असा हातात घेतेय,
पहिल्यांदाच कुणाची इतकी ओढ वाटतेय !
हा पहिला स्पर्श मी आयुष्यभर जपून ठेवेन "

मी नाही म्हणू शकलो तसंच
कारण....
माझ्या जवळ जवळ सगळ्याच पहिल्या वेळा
आधिच झालेल्या

खरं तर पहिला शब्द सोडला तर
माझ्याही मनात भावना तशाच,
तितक्याच उत्कट
पण तिच्या अपेक्षांसमोर अपूर्‍या,
अधुर्‍याच 'पहिल्या' शब्दाविना...

तिनं माझ्या डोळ्यांत बघितलं
आणि तिला जे कळायचं ते कळलं
नकळत हातात घेतलेला हात
तिने अगदी हळूवारपणे सोडवून घेतला
मग....
मी नाहीच थांबवू शकलो,
तिच्या पापण्यांत डोकावणारी आसवं
माझ्या मनात येणारी आठवं
' मला उशीर होतोय मी निघते म्हणत '
तिची निरोप घेणारी पावलं

आणि तितक्यात...
पाऊस आला
अगदी मुसळधार
मी नेहमीसारखाच होतो छ्त्रीशिवाय
आज तीही छत्री विसरलेली
तसं भिजणं, आम्हां दोघांच्या आवडीचं

पुढच्या काही क्षणांतच आम्ही दोघेही चिंब झालो
ती थांबली, वळली....
मी जवळ गेलो
आणि ती पटकन मिठीत शिरली....
मी, " पहिला पाऊस कधीच पडून गेला ग! "
ती, " हो, पण आताचा पाऊसही तितकाच खरा आहे ! "

-------------------------------- जगदिश

Thursday, July 17, 2008

पाऊस....बाहेरचा आणि आतला

खिडकीत बसून
बाहेर कोसळणारा पाऊस बघणं
आता नेहमीचंच झालंय
हल्ली मी पावसात भिजायला जात नाही
तुझ्याविनाच चिंब व्हायचं?
छे! मनच मानत नाही

मग थेंबांनाही वाटते ओढ माझी
येतात ते माझ्या खिडकीपर्यंत
पण ओंजळ पूढे करून
मी त्यांना अनुभवत नाही
तुझा आधार सुटल्यापसून
हातच पुढे सरत नाही

कधी पाउस वाराही घेतो साथिला
अन् डोकावू पाहतो माझ्या घरात
खिडकीचं बंद होणं तेव्हा
एक क्षणही लांबत नाही
हल्ली तुझ्या आठवणींना
घरातच मी घेत नाही

आज मात्र मला पावसानं
भर रस्त्यात पकडलं
आठवण करुन देऊन तुझी
अन् मग विचारलं,
"तुला झालंय तरी काय?"
मी म्हटलं नातं तुटलं,
आता कुणाची सोबत नाही
तूही जा आता
जून्या आठवणींशी मी
मन माझं जोडत नाही

तो गेला, थोडा रागावून
न भिजवता !
भिजण्यापासून तर वाचलो
प्रश्न एकच होता,
मनात दाटलेल्या पावसापासनं
मी कसा वाचणार आता ?

----------------------------------------- जगदिश

Wednesday, June 4, 2008

रातराणी आणि गुलमोहर

' आज रातराणी दरवळत नाहिये रोजच्यासारखी ! '
सखीनं अंगणात येऊन बघितलं......
आणि....रातराणीला पाहून सखी हिरमूसली

ती फुलली तर नव्हतीच, उन्मळून पडली होती
थोड्या कोमोजलेल्या फुलांसह
विस्कटलेल्या, ओरबाडलेल्या पानांमधे

सखीही खचली, उदास झाली
जिच्या साथीत इतक्या राती जागवल्या होत्या
जिच्या असण्यानं चोहो दिशा भारुन टाकल्या होत्या
जिनं सखीला विरहात सावरलं होतं
जिच्या दरवळत्या गंधानं तन-मन मोहरलं होतं
ती आज नव्हती....
आणि यापूढे कधीच असणार नव्हती

मग सखी एकटीच जागली एक रात्र
आठवणी आल्या
श्वास अडले
क्षण बावरले
नभ कातर झालं
मेघ बरसले
डोळे थकले
आणि हळूवार, नकळतच
मिटूनही गेले

सकाळी जाग आल्यावर
सखी गच्चीत गेली
तशीच उदास... दु:खी

समोर बघीतलं तर
गुलमोहर बहरला होता......

सखीच्या ओठांवर हसू फुललं
ती दु:ख विसरली
रात विसरली
त्या बहरात हरवली

अंगणात तर रातराणी नव्हतीच आता
आणि सखीच्या मनातही
गुलमोहरच भरला होता !

----------------------------------------- जगदिश

Thursday, March 20, 2008

सुकलेली फुलं...... Revised.....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

तिच्या डोळ्यांत बघून एकदा म्हणायचयं
" सगळं जग तुझ्यामूळे माझं झालयं
तरी एक करशील ?
मीच माझा उरलो नाही
तुझा झालोय !
तू माझी होशील ? "

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

-------------------------- जगदिश

Wednesday, March 19, 2008

चांदणे....

गोठती नजरा अशा की बोलणे राहून जाते
मागण्याआधीच मिळते मागणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

सांज वेडी रंगताना तार अन् झंकारताना
साजणीही धुंद होते साद मजला घालताना
हात हाती गुंफताना रात अन् अंधारताना
श्वास वेडे स्पर्श वेडे अधर ओठी बांधताना

प्रीत फुलते धुंद होते प्रणयही बहरून येतो
बंधने तुटता मनाला रोखणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

पावसातून नाहताना गार वारा साहताना
अंगभर उठते शहारे या मना वेडावताना
रातभर कधी जागताना चांदण्यांना झेलताना
प्रियतमेला पाहतो मी अंतरी आनंदताना

बरसतो उल्हास आणि आठवांना भारती क्षण
वेळ ही ढळली तरीही भारणे राहून जाते
साथ असता साजणीची धुंद मी होतो असा की
रात ही सरली तरीही चांदणे राहून जाते

------------------------------------ जगदिश

Tuesday, March 18, 2008

या आयुष्याची कविता मांडत असतो.....

संधेत रंगत्या नभात नाहत असतो
अन् रातीला तार्‍यांशी बोलत बसतो
चांदवा कितिदा येतो कवितेमधूनी
जागूनी रातभर पहाट शोधत असतो

मी रानफुलांच्या गंधासोबत वाहतो
अन् खळखळत्या ओढ्यांतून वळसे घेतो
वैशाख मागतो श्रावणसरीचे थेंब
मग रिमझिमता मी पाऊस बरसत असतो

प्रत्येक स्पंदना पूर्णत्वाने जगतो
अन् आसवांस दवबिंदू समजून जपतो
रातीत स्वतःला स्वतःच करतो साथ
विरहाला मी खूबीने फसवत असतो

मी आठवणींचे तोरण बांधत असतो
अन् उगा कधी दु:खाशी भांडत बसतो
शब्दांत गुंफतो क्षणोक्षणीचा हर्ष
या आयुष्याची कविता मांडत असतो

----------------------------------------- जगदिश

Monday, March 17, 2008

आता बघायचयं...

आता बघायचयं श्वासांना साथ सोडताना
जसं बघितलं माझ्या माणसांना माझा हात सोडताना

आता बघायचयं सुखाला दगा देताना
उत्तुंग शिखरावरुन तितक्याच खोल दरीत ढकलणारा धक्का खाताना

आता बघायचंय प्रेमाला विरताना
आणि प्रेमासोबत स्वतःला संपताना

आता बघायचयं आंधळ्या विश्वासाचा घात होताना
पाठीवर पडणार्‍या घावांच्या वेदना अनूभवताना

आता बघायचयं आयुष्याला फसवताना
एखाद्या बेसावध क्षणी मृत्यूला कवटाळताना !!

----------------------------------------- जगदिश

कधीतरी आठवांना तुझ्या.......

कधीतरी आठवांना तुझ्या
विसरूही पाहतो साजणे
भळभळ वाहत्या काजळा
आवरूही पाहतो साजणे

तुझ्याविना श्वास अडतात हे
तुझ्याविना क्षणही सलती सये
नयनांत आसवे सोडूनी
स्मृती बेजार करती सये

रातभर जागता मेघ मी
बरसत राहतो साजणे
कधीतरी आठवांना तुझ्या
विसरूही पाहतो साजणे

कधी कधी चालता चालता
नकळत हरवतो वाट मी
थकती एकटी पाऊले
तरी तुझी शोधतो साथ मी

तुझ्यविना साजणे 'मी' नको
तुझ्यविना चालणेही नको
तुझ्यावर जीव जडला असा
तुझ्यविना हे जीणेही नको

अखेरच्या श्वासाआधी तरी
येशील तू जाणतो साजणे
आठवांत हरवूनी मी तुझ्या
जगूनही पाहतो साजणे

भळभळ वाहत्या काजळा
आवरूही पाहतो साजणे
कधीतरी आठवांना तुझ्या
विसरूही पाहतो साजणे

-------------------------- जगदिश