सकाळी एक भूकेलेलं पोट अतिशय भिकार नजरेनं माझ्याकडे बघतं
मी त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकतो
मग संध्याकाळी चवीनं कोंबडीचा आस्वाद घेतो आणि म्हणतो, 'मी माणूस !'
मॉलच्या बाहेर अजून एक गरजू भेटतो
केविलवाणा चेहरा करून, 'एक रुपया द्या हो साहेब', म्हणतो
मी त्याच्यावर चिडतो, त्याला हाकलतो, मॉलमधे जातो
दोन हजाराची ब्रँडेड जीन्स विकत घेतो, वर दीड हजाराचा शर्टही घेतो
तो घालून मिरवतो आणि म्हणतो, 'मी माणूस !'
ऑफिसमधून घरी येताना रस्त्यात एक अपघात झालेला दिसतो
बघ्यांची गर्दी झालेलीच असते, मीही त्यात समिल होतो
'स्टोरी काय?' जाणून घेतो
कुणीतरी म्हणतं, 'उचला रे त्यांना, हॉस्पिटलमधे नेऊ!'
मी हळूच काढता पाय घेतो
दूसर्या दिवशी तीच स्टोरी तिखट - मीठ लावून सांगतो आणि म्हणतो 'मी माणूस!'
'स्फोट झालेत' न्यूज येते,
मी सुन्न होतो, चुकचूकतो.. थोडाच वेळ...
मग १६ की १७, मित्रासोबत वाद घालतो
'मीच बरोबर', त्याला एकदा न्यूज चॅनेल दाखवतो
जिंकल्याचा आनंद घेतो
चॅनेल बदलतो, क्रिकेट बघू लागतो आणि म्हणतो 'मी माणूस!'
कवी आहे, कविता लिहितो
दू:ख, अत्याचार, दुर्दशा शब्दांमधे प्रभावीपणे रेखाटतो
कधी करूण, कधी रागीट चेहरा करुन लोकांसमोर सादर करतो
वाहवा, टाळ्या मिळवतो, आणि....
मनातल्या मनात स्वतःवरच खूश होत वही मिटतो
आणि म्हणतो 'मी माणूस!'
--------------------------------------------जगदिश
Monday, December 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
खरे आहे जग्गू.............
अगदी खरे आहे तुझे....
सगळेच घडते असेच, आपण फ़सतो नेहमी असेच
दोन्ही बाजु आयुष्याच्या, गाजवतो नेहमी असेच
Post a Comment